MKCL दुष्काळ निर्मूलन’ अभियान

गेल्या तीन वर्षांपासून अवर्षण, पावसाची अनियमितता आणि गारपीट अश्या लागोपाठ झालेल्या नैसर्गिक आघातांमुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागातील शेतीची अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे. शेतकरी असो वा भूमिहीन मजूर, सर्वांच्याच चरितार्थाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. शेतकरी आत्महत्यांचे दुर्दैवी लोण नवनव्या तालुक्यांमध्ये पसरू लागले आहे. महाराष्ट्रातील पाणीसाठा जेमतेम ५५% च्या आसपास आहे. नेहमी प्रमाणे या दुष्काळाची झळ देखील शहरांपेक्षा ग्रामीण भागालाच खरी जास्त बसणार आहे. २०१६ च्या पावसाळ्यापर्यंतचे उर्वरित ९-१० महिने तग धरून केवळ जगणे, हे एक अभूतपूर्व आव्हान लक्षावधी ग्रामस्थ आणि पाळीव पशू यांच्यासमोर उभे ठाकले आहे.

‘कायमस्वरूपी दुष्काळ निर्मूलन’ या कार्यक्रमांतर्गत MKCLच्या ‘नॉलेज फाउंडेशनने’ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातला आपला अनुभव आणि कौशल्ये सर्वतोपरी वापरून आपल्या ग्रामस्थ बंधू भगिनींच्या पाठीशी उभे रहाण्याचा निश्चय केला आहे. शासनाकडून दुष्काळग्रस्तांसाठी वेळोवेळी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती आणि त्यांच्या अंमलबजावणीचा तपशील लाभार्थ्यांना सुलभरीत्या उपलब्ध करून देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे हे MKCLचे पहिले पाऊल असेल.

MKCLचा MS-CIT हा संगणक साक्षरता अभ्यासक्रम ५००० केंद्रांच्या राज्यव्यापी नेटवर्कच्या माध्यमातून सर्व तालुक्यांमध्ये शिकविला जातो. यावर्षीच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच आपले संगणकाचे कौशल्य वापरून, काही छोट्या कृती करून आपल्या परिसरातील दुष्काळ निवारण कार्याला हातभार लावता यावा व आपल्या गावातील दुष्काळग्रस्त बांधवांना माहितीसेवा देऊन मदत करता यावी यासाठी काही अभिनव उपक्रम MS-CIT अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येत आहेत.

या मध्ये मनरेगा, रोजगार हमी योजना, पाणी पुरवठा, रेशन, चारा छावण्या, आरोग्य, अनुदान, शासनाच्या कल्याणकारी योजना इ. अतिशय कळीच्या विषयांचा समावेश आहे